नाताळ व नववर्षाच्या सुट्ट्यांत रायगड ‘हाऊसफुल्ल’; अलिबागमध्ये पर्यटकांची गर्दी, वाहतूक कोंडी


रायगड (प्रतिनिधी): नाताळच्या सुट्ट्यांचा पर्यटनासाठी पुरेपूर आनंद लुटण्यासाठी आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी पुणे, मुंबईसह महाराष्ट्राच्या विविध भागांतून पर्यटकांची पावले रायगड जिल्ह्याकडे वळली आहेत. गुरुवार, दि. २५ डिसेंबरपासूनच रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारे, मंदिरे, ऐतिहासिक वास्तू, किल्ले, तीर्थक्षेत्रे तसेच अन्य पर्यटनस्थळांवर पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. यामध्ये कुटुंबीयांसह आलेले पर्यटक तसेच शाळा व महाविद्यालयांच्या सहलींचा ओघही लक्षणीय आहे.
या वाढलेल्या पर्यटनामुळे पर्यटनावर अवलंबून असलेले छोटे-मोठे व्यावसायिक, हॉटेल व्यावसायिक, खानावळी, दुकानदार व स्थानिक सेवा पुरवठादार यांची सध्या चांगलीच चांगभल होत आहे. रायगड आणि संपूर्ण कोकण पट्ट्याचे मनमोहक निसर्गसौंदर्य पर्यटकांना नेहमीच आकर्षित करत आले आहे. यंदा सुट्ट्यांच्या काळात रायगड जिल्हा पर्यटकांनी अक्षरशः ‘हाऊसफुल्ल’ झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
२०२५ च्या शेवटच्या विकेंडला अलिबाग समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. समुद्रकिनाऱ्यावर मौजमजा, सूर्यास्ताचा आनंद आणि विविध पर्यटनस्थळांची भेट यामुळे वातावरण उत्साहपूर्ण होते. मात्र, सुट्टी संपल्यानंतर परतीच्या प्रवासात अनेक पर्यटकांना अडचणींचा सामना करावा लागला. विशेषतः अलिबाग–वडखळ मार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे पर्यटकांना तासन्‌तास वाहतुकीत अडकून राहावे लागले.
पर्यटनाची ही वाढती गर्दी लक्षात घेता वाहतूक नियोजन, सुरक्षितता व मूलभूत सुविधांवर अधिक लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे. तरीही, सुट्ट्यांच्या या काळात रायगड जिल्ह्याने पर्यटनाच्या माध्यमातून चांगलीच चैतन्यपूर्ण आणि उत्साही छाप पाडली आहे.