रायगड (प्रतिनिधी): शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते मंगेश सदाशिव काळोखे यांच्या हत्येच्या निषेधार्थ सोमवारी सायंकाळी खोपोली शहरात कॅन्डल मार्चचे आयोजन करण्यात आले होते. या मार्चमध्ये आमदार महेंद्र थोरवे, मयत मंगेश काळोखे यांच्या दोन मुलींसह शिवसैनिक, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
साईबाबानगर येथील मंगेश काळोखे यांच्या निवासस्थानापासून खोपोली पोलीस ठाण्यापर्यंत कॅन्डल मार्च काढण्यात आला. “मंगेश काळोखे अमर रहे” अशा घोषणांनी संपूर्ण बाजारपेठ दुमदुमून गेली. शांततेत पार पडलेल्या या मार्चद्वारे आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी आमदार महेंद्र थोरवे आणि मंगेश काळोखे यांच्या दोन मुलींनी उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहूल (खालापूर) यांना निवेदन सादर केले. हत्येतील मुख्य सूत्रधारासह उर्वरित आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली. यावर प्रतिक्रिया देताना उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहूल यांनी आतापर्यंत दहा आरोपींना अटक करण्यात आली असून तपास पूर्ण करून मुख्य सूत्रधारालाही लवकरच ताब्यात घेतले जाईल, असे आश्वासन दिले.
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी खोपोली शहरात तीन दंगल नियंत्रण पथकांसह जिल्ह्यातून सुमारे 110 पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते.









