अलिबाग (प्रतिनिधी): अलिबाग–रेवस मार्गावरील चोंढी पुलाजवळ मंगळवारी (दि. ३०) रात्री दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात हर्षित संजोग पालवणकर (रा. अलिबाग) या तरुणाचा मृत्यू झाला, तर शिवम गुप्ता हा गंभीर जखमी झाला आहे. जखमी शिवम गुप्ता याच्यावर नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हर्षित पालवणकर व शिवम गुप्ता हे दोघे मांडवा येथे जेवण करून दुचाकीवरून अलिबागकडे परतत असताना चोंढी पुलाजवळील तीव्र वळणावर दुचाकीवरील नियंत्रण सुटले. रस्त्याच्या कडेला असलेल्या बॅनरच्या लोखंडी खांबाला दुचाकी जोरात धडकली. धडकेनंतर दुचाकी काही अंतर घसरत गेल्याने दोघेही गंभीर जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच मांडवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना तातडीने सिव्हिल हॉस्पिटल, अलिबाग येथे दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान हर्षित पालवणकर याचा मृत्यू झाला. गंभीर जखमी शिवम गुप्ता याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.









