रायगड (प्रतिनिधी): रायगड जिल्ह्यातील माणगाव येथील ताम्हिणी घाटात शुक्रवारी दुपारी एका खासगी बसचा भीषण अपघात झाला. तीव्र वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला असलेल्या खडकावर आदळली. या धडकेत बसने एका कारलाही उडवले असून ती कार रस्ता ओलांडून झाडीत अडकली. या अपघातात बसमधील २७ प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी ८ ते १० जणांची प्रकृती गंभीर आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील भोसरी येथील सावन IB Auto प्रा. लिमिटेड कंपनीचे सुमारे ५० कर्मचारी काशिद बीचला फिरण्यासाठी या बसने निघाले होते. अपघात ताम्हिणी घाटातील प्रसिद्ध ‘गारवा हॉटेल’ परिसरात झाला. बस दरीत कोसळण्याऐवजी डोंगराला धडकल्याने मोठा अनर्थ टळला.
अपघाताची माहिती मिळताच माणगाव पोलीस व बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने जखमींना बाहेर काढून माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.









