महाड नगराध्यक्षपदी शिवसेनेचे सुनिल कविस्कर, कार्यभार स्वीकारला


महाड (रेश्मा माने): महाड नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेचे सुनिल कविस्कर यांनी अधिकृतपणे कार्यभार स्वीकारला. रोहयो मंत्री ना. भरतशेठ गोगावले यांच्या सुविद्य पत्नी व माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. सुषमाताई गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. अनेक वर्षांनंतर महाड नगर परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकला असून, याबद्दल सुषमाताई गोगावले यांनी सर्व शिवसैनिक व महाडकर नागरिकांचे अभिनंदन केले.
या प्रसंगी जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर, संपर्क प्रमुख अरुण चाळके, महिला आघाडी प्रमुख निलिमा घोसाळकर, युवासेना जिल्हा प्रमुख विपुल उभारे, जिल्हा प्रवक्ते नितीन पावले यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
नगराध्यक्ष सुनिल कविस्कर यांनी महाडची सत्ता ना. भरतशेठ गोगावले यांच्या चरणी अर्पण करत पुढील पाच वर्षांत महाडकरांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. महाड शहर स्वच्छ, सुंदर व पूरमुक्त करण्यासाठी पारदर्शक आणि लोकाभिमुख कारभार राबवला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.