ताम्हिणी घाटात पुन्हा भीषण अपघात; थार दुर्घटनेच्या ठिकाणीच कार दरीत कोसळून चालकाचा मृत्यू


रायगड (प्रतिनिधी) : ताम्हिणी घाटातील सणसवाडी येथे नोव्हेंबर महिन्यात झालेल्या थार अपघाताची पुन्हा एकदा दुर्दैवी पुनरावृत्ती झाली आहे. ज्या ठिकाणी २० नोव्हेंबर रोजी थार गाडी दरीत कोसळून पुण्यातील सहा तरुणांचा मृत्यू झाला होता, त्याच ठिकाणाहून आज एक कार खोल दरीत कोसळली. दुपारी साडेतीन ते चारच्या सुमारास चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. या दुर्घटनेत चालकाचा जागीच मृत्यू झाला असून मृताची ओळख अद्याप पटलेली नाही.
अपघाताची माहिती मिळताच माणगाव पोलीस, बचाव पथके आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने शोध घेतला असता, नोव्हेंबरमधील अपघातग्रस्त थार गाडीच्या शेजारीच ही कार अडकलेली आढळून आली. बचाव पथकाने दोरीच्या साहाय्याने खाली उतरून चालकाला बाहेर काढले; मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.
दरम्यान, ताम्हिणी घाटात आज दिवसभरातील हा दुसरा अपघात असून, याआधी गारवा हॉटेलजवळ खासगी बस अपघातात २७ जण जखमी झाले होते. सणसवाडी येथील तीव्र वळणावर संरक्षक कठडे नसल्याने वारंवार अपघात होत असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे.