रायगड (विषेश प्रतिनिधी): खोपोली शहरातील शिवसेना नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांच्या हत्येप्रकरणी पोलिस तपासाला महत्त्वाची दिशा मिळाली आहे. या प्रकरणात आतापर्यंत १२ आरोपींना अटक करण्यात आली असून ही हत्या सुपारी देऊन करण्यात आल्याचे तपासातून निष्पन्न झाले आहे. ज्यांचा या गुन्ह्यात थेट किंवा अप्रत्यक्ष सहभाग आढळून आला आहे, अशा सर्वांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक आँचल दलाल यांनी दिली.
पोलिस तपासात हत्येच्या कटाची आखणी, सुपारी देणारे आणि प्रत्यक्ष गुन्हा करणारे आरोपी यांची साखळी उघडकीस आली आहे. आरोपींकडून चौकशीत महत्त्वाची माहिती मिळत असून आर्थिक व्यवहार, फोन रेकॉर्ड्स आणि इतर तांत्रिक पुरावे तपासले जात आहेत. या प्रकरणाचा तपास अत्यंत बारकाईने आणि निष्पक्षपणे सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि पक्षाचे प्रवक्ते भरत भगत यांचा या गुन्ह्यात अद्याप कोणताही सहभाग आढळून आलेला नसल्याचे पोलिस अधीक्षकांनी सांगितले. मात्र, त्यांच्या भूमिकेबाबतचा तपास सुरू असून तो अंतिम टप्प्यात आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर वस्तुस्थिती स्पष्ट केली जाईल, असेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. हे प्रकरण खोपोलीत मोठ्या चर्चेचा विषय ठरले असून नागरिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.









