रायगड (प्रतिनिधी) : रायगड जिल्ह्यात घडणाऱ्या गुन्ह्यांची उकल करण्यावर पोलीस प्रशासनाचा विशेष भर असून त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याचे प्रतिपादन रायगडच्या पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी केले. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी पोलीस दल सातत्याने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
गुन्हे घडल्यावर केवळ तपासापुरते न थांबता, भविष्यात गुन्हेगारी कारवायांना आळा बसावा यासाठी प्रतिबंधात्मक कारवाईवरही भर दिला जात आहे. संशयितांवर नजर ठेवणे, अवैध धंद्यांवर छापे टाकणे, शस्त्र जप्ती, तडीपारी व हद्दपारीसारख्या कारवाया प्रभावीपणे राबवण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यामुळे अनेक गुन्हे घडण्यापूर्वीच रोखण्यात यश मिळाले आहे.
येत्या वर्षात गुन्ह्यांचे शाबितीकरणाचे प्रमाण आणखी वाढावे यासाठी तपास यंत्रणा अधिक सक्षम केली जाणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, सीसीटीव्ही नेटवर्कचा विस्तार, सायबर गुन्ह्यांवर विशेष लक्ष तसेच नागरिकांचा सहभाग वाढवण्यावर भर दिला जाणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. पोलीस व जनता यांच्यातील समन्वय अधिक दृढ करून रायगड जिल्हा अधिक सुरक्षित करण्याचा निर्धार पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी व्यक्त केला.









