महाविकास आघाडी आगामी निवडणुकांत चांगली कामगिरी करेल – राजाभाऊ ठाकूर


अलिबाग (प्रतिनिधी): महाविकास आघाडी आगामी निवडणुकांमध्ये चांगली कामगिरी करेल, असा विश्वास काँग्रेस नेते राजाभाऊ ठाकूर यांनी व्यक्त केला. काँग्रेसचे युवा नेते उमेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभीष्टचिंतन सोहळ्यात ते बोलत होते. या कार्यक्रमात महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना ‘कुलाबा जीवन गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाला काँग्रेस नेते भाई जगताप आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. भाई जगताप यांनी आपल्या भाषणात राजाभाऊ ठाकूर आणि उमेश ठाकूर यांच्या सामाजिक व राजकीय कार्याचे कौतुक केले. जयंत पाटील यांनी जिल्ह्यात महाविकास आघाडी अधिक मजबूत करण्यासाठी शेकाप सर्वतोपरी सहकार्य करेल, असे स्पष्ट केले. तसेच अलिबाग नगरपालिकेत काँग्रेसला उपनगराध्यक्ष पद देण्याची ग्वाही त्यांनी दिली.
श्रीवर्धन नगराध्यक्षपदी निवडून आलेले अतुल चौगुले यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी उमेश ठाकूर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. एकतेच्या बळावर महाविकास आघाडी आगामी काळात यशस्वी ठरेल, असा आशावाद यावेळी व्यक्त करण्यात आला.