डॉन कोण हे लवकरच दाखवू… तटकरे यांच्या डान्सवर महेंद्र दळवींची टीका


अलिबाग (प्रतिनिधी): मुरुड महोत्सवात खासदार सुनील तटकरे यांनी “मैं हूं डॉन” या गाण्यावर केलेल्या डान्सवरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून, यावर अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी जोरदार टोलेबाजी केली आहे. “रायगड जिल्ह्यात आमची ताकद सातत्याने वाढत आहे. ही ताकद एकत्र केली तर जिल्हा परिषद निवडणुकीत तीसचा आकडा नक्कीच पार करू. त्यामुळे कुणी स्वतःला ‘मैं हूं डॉन’ म्हणत असेल, तर त्याला योग्य उत्तर जिल्हा परिषद निवडणुकीनंतर दिलं जाईल,” असे सूचक विधान दळवी यांनी सुनील तटकरे यांना उद्देशून केले.
अलिबाग तालुक्यातील आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघाची आढावा बैठक पोयनाड येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत दळवी बोलत होते. त्यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आवाहन करत संघटन बळकट करण्यावर भर दिला. यावेळी शिवसेनेची ताकद तळागाळात वाढवण्यासाठी सर्वांनी एकत्र काम करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
या बैठकीला जिल्हा प्रमुख राजा केणी , ज्येष्ठ नेते दिलीप भोईर, कामगार नेते दीपक रानवडे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. याच वेळी आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघातून रसिका केणी यांची उमेदवारी अधिकृतपणे जाहीर करण्यात आली.