इस्कॉन अलिबागतर्फे वैष्णवी पदयात्रा उत्साहात संपन्न


अलिबाग (प्रतिनिधी) : इस्कॉन अलिबाग यांच्या स्त्रीनो शुक्रवार, दि. ०२ जानेवारी २०२६ रोजी शहरात एकदिवसीय वैष्णवी पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या पदयात्रेचा मुख्य उद्देश महिला सशक्तीकरण, सांस्कृतिक मूल्यांची जनजागृती तसेच समाजात शांतता व एकतेचा संदेश प्रसारित करणे हा होता.
सकाळी ९ ते १२ या वेळेत ही साखळी पदयात्रा ब्राम्हण आळी येथील श्रीराम मंदिरातून प्रारंभ झाली. एस.टी. स्टँड मार्ग, महेश टॉकीज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला वळसा घालून, एस.टी. स्टँड मार्ग बाजारपेठ, जोगळेकर नाका, अंकुर मार्ट, जामा मशीद परिसरातून पुढे जात जुनी बाजारपेठेतील श्री लक्ष्मीनारायण मंदिर येथे पदयात्रेचा समारोप झाला.
या पदयात्रेत सहभागी महिलांनी वैष्णवी परंपरेतील पारंपरिक वेशभूषा परिधान करून भक्तिगीते, हरिनाम संकीर्तन व नृत्याच्या माध्यमातून नारीशक्तीचे सुसंस्कृत, सकारात्मक व आत्मविश्वासपूर्ण रूप समाजासमोर सादर केले. या भक्तिमय वातावरणामुळे संपूर्ण शहरात आध्यात्मिक ऊर्जा व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
पदयात्रेचा शुभारंभ नगरसेविका मा. सौ. श्वेता पालकर व नगरसेवक श्री. संदीप पालकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला. इस्कॉन अलिबागचे अध्यक्ष गिरीराज गोवर्धन दास, डॉ. जयभदा मानाजी व भवतारीणी माताजी यांच्या मार्गदर्शनाखाली ही पदयात्रा यशस्वीरीत्या पार पडली.