पेंझारी–नागोठणे रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागणीला यश


अलिबाग (प्रतिनिधी) : तालुक्यातील पेंझारी ते नागोठणे हा अत्यंत महत्त्वाचा व वर्दळीचा मार्ग सध्या मोठ्या प्रमाणात खराब झाला आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी माजी आमदार श्री. सुभाष ऊर्फ पंडितशेठ पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली होती.
सदर रस्ता हेम योजनेअंतर्गत सुमारे तीन ते चार वर्षांपूर्वी दुरुस्त करण्यात आला होता. मात्र, सध्या रस्त्याची साईडपट्टी तसेच मुख्य रस्ता मोठ्या प्रमाणात खराब झाला असून अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांसह स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.
अलिबाग व रोहा तालुक्यांना जोडणारा हा प्रमुख मार्ग असल्याने तो सुस्थितीत असणे अत्यंत आवश्यक आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक ती कार्यवाही करावी व रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामास तातडीने मंजुरी द्यावी, अशी विनंती श्री. पाटील यांनी केली होती.
दरम्यान, या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामास सुरुवात झाल्याने माजी आमदार श्री. सुभाष ऊर्फ पंडितशेठ पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे आभार मानले असून, काम दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्याची अपेक्षाही व्यक्त केली आहे.