अलिबाग तालुका वाहतूक कोंडीच्या विळख्यात; काँग्रेस नेते राजाभाऊ ठाकूर यांची नाराजी


रायगड (प्रतिनिधी): अलिबाग तालुक्यात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक, प्रवासी आणि पर्यटक हैराण झाले असून या ज्वलंत नागरी समस्येकडे काँग्रेस नेते राजाभाऊ ठाकूर यांनी जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. पर्यटन नगरी म्हणून ओळख असलेल्या अलिबाग शहरासह संपूर्ण तालुक्यातील प्रमुख मार्गांवर सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
या पार्श्वभूमीवर राजाभाऊ ठाकूर यांनी जिल्हाधिकारी किशन जावळे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे बंधू तथा अलिबाग नगरपरिषदेचे नगरसेवक समीर ठाकूर आणि अमोल म्हात्रे उपस्थित होते. निवेदनात त्यांनी वाहतूक कोंडीमुळे होणाऱ्या त्रासाची माहिती देत ठोस उपाययोजना सुचवल्या.
अलिबाग तालुक्यातील वडखळ–अलिबाग, अलिबाग–रेवस आणि अलिबाग–रोहा हे प्रमुख मार्ग सतत वाहतूक कोंडीने ग्रस्त असतात. याचा फटका स्थानिक नागरिकांसह प्रवासी व पर्यटकांनाही बसत आहे. ही समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी काही महत्त्वाच्या ठिकाणी उड्डाणपूल उभारणे गरजेचे असल्याचे राजाभाऊ ठाकूर यांनी नमूद केले.
त्यांनी अलिबाग–रेवस मार्गावर नागडोंगरी ते मांडवा दस्ती, अलिबाग–पेण मार्गावर सेंट मेरी हायस्कूल ते सागाव मारुती, पेझारी चेकपोस्ट ते चौकीचा पाडा, तसेच अलिबाग–रोहा मार्गावर श्रीबाग ते बेलकडे फाटा या ठिकाणी उड्डाणपूल उभारण्याची मागणी केली आहे. जिल्हा प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.