युवा प्रशिक्षणार्थी संघटनेची शासनाकडे ठाम मागणी
रायगड (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षित झालेल्या हजारो बेरोजगार युवकांना सध्या कोणताही रोजगार उपलब्ध नसल्याने त्यांच्या भवितव्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या प्रशिक्षणार्थींना कंत्राटी पद्धतीने का होईना, पण शासकीय सेवेत सामावून घ्यावे, या प्रमुख मागणीसाठी युवा प्रशिक्षणार्थी संघटनेच्या वतीने मुंबईतील आझाद मैदान येथे साखळी उपोषण सुरू आहे. शासनाने तात्काळ निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनेचे राज्य सचिव तथा रायगड जिल्हाध्यक्ष ऋषिकेश पवार यांनी दिला.
अलिबाग येथील शेतकरी भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शेतकरी कामगार पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, अलिबाग तालुका चिटणीस सुरेश घरत, शेकाप युवक आघाडीचे विक्रांत वार्डे आदी उपस्थित होते. युवा प्रशिक्षणार्थींच्या न्याय्य मागणीला शेकापचा संपूर्ण पाठिंबा असल्याचे चित्रलेखा पाटील यांनी स्पष्ट केले.
ऋषिकेश पवार यांनी सांगितले की, दीड वर्षापूर्वी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत 6 ते 10 हजार रुपये मानधनावर प्रशिक्षणार्थींना कंत्राटी पद्धतीने कामावर घेतले गेले. मात्र सहा महिन्यांनंतर अचानक सेवामुक्त करण्यात आले. त्यानंतर आंदोलनानंतर पुन्हा पाच महिन्यांसाठी कामावर घेतले गेले. एकूण 11 महिने सेवा दिल्यानंतरही आज हे प्रशिक्षणार्थी पुन्हा बेरोजगारीच्या खाईत लोटले गेले आहेत.
राज्यात सुमारे 1 लाख 34 हजार प्रशिक्षणार्थींची भरती करण्यात आली होती. यापैकी रायगड जिल्ह्यात 693 प्रशिक्षणार्थी कार्यरत होते. मात्र शासनाकडे निधी नसल्याचे कारण पुढे करून शासकीय भरती प्रक्रिया थांबवण्यात आली आहे.
11 महिने काम करूनही आज रोजगारापासून वंचित असलेल्या प्रशिक्षित युवकांसाठी शासनाने अस्थापनेसाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करून द्यावा व त्यांना तात्काळ रोजगार द्यावा, अशी ठाम मागणी युवा प्रशिक्षणार्थी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
*******
प्रशिक्षणार्थींनी शासनाने तात्काळ रखडलेले मानधन अदा करावे, योजनेतील त्रुटी दूर कराव्यात आणि भविष्यात अशा प्रकारची फसवणूक होणार नाही याची हमी द्यावी. युवा प्रशिक्षणार्थी योजना युवकांच्या भविष्यासाठी महत्त्वाची असताना अशा प्रकारच्या गैरव्यवस्थेमुळे योजनेची विश्वासार्हता धोक्यात येत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने तातडीने लक्ष घालून न्याय द्यावा.
– ऋषीकेश पवार, अध्यक्ष- युवा प्रशिक्षणार्थी संघटना
*********
या योजनेतून युवा प्रशिक्षणार्थींची घोर फसवणुक आहे. लाडकी बहिण योजना राबवण्यासाठी या प्रशिक्षणार्थींनी दिवसरात्र मेहनत घेतली. यासाठी आपल्या नव्या कल्पना दिल्या. काम झाल्यानंतर या युवा प्रशिक्षणार्थींकडे पुर्णपणे दुर्लक्ष केले जात आहेत. निवडणुकांपुर्वी दिलेली कोणतेही आश्वासने राज्यसरकारकडून पाळली जात नाही. या युवकांच्या शेकाप खंबीर पाठीशी राहील.
– चित्रलेखा पाटील, शेकाप, प्रवक्त्या









