मापगाव येथे दरोडेखोरांवर पोलिसांची तडफदार कारवाई; नागरिकांकडून अभिनंदन


अलिबाग (प्रतिनिधी): अलिबाग तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत मापगाव हद्दीतील मौजे मापगाव येथे दि. ४ जानेवारी २०२६ रोजी श्री. दिलीप पाथरे यांच्या बंगल्यावर भीषण दरोड्याची घटना घडली होती. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. दरोड्याची माहिती मिळताच अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मा. श्री. किशोर सांळे साहेब व त्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
पोलीसांनी प्रसंगावधान राखत अत्यंत शिताफीने व जलदगतीने तपासाची चक्रे फिरवली. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, गुप्त माहिती आणि कसोशीने केलेल्या तपासाच्या आधारे या गुन्ह्यातील सर्व संशयित आरोपींचा शोध घेऊन त्यांना अल्पावधीत अटक करण्यात आली. पोलिसांच्या या त्वरित व तडफदार कार्यवाहीमुळे श्री. पाथरे कुटुंबीयांसह मापगाव परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सौ. आंचल दलाल, पोलीस अधीक्षक रायगड यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणाऱ्या अलिबाग पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या यशस्वी कारवाईबद्दल काँग्रेस नेते राजाभाऊ ठाकूर, माजी सरपंच सुनील थळे, सुचित थळे, अमोल म्हात्रे, आकाश राणे तसेच ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांच्या वतीने पोलिसांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहेत. या घटनेमुळे परिसरात पुन्हा एकदा सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.