अलिबाग (प्रतिनिधी) : अलिबाग नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदासाठी सोमवारी (दि. 12) निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाच्या (शेकाप) ॲड. मानसी म्हात्रे यांनी भाजपच्या ॲड. अंकित बंगेरा यांचा १७ विरुद्ध ३ मतांनी दणदणीत पराभव करत उपनगराध्यक्षपद पटकावले. मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी ॲड. मानसी म्हात्रे यांची उपनगराध्यक्ष म्हणून अधिकृत घोषणा केली.
अलिबाग नगरपरिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले होते. नगराध्यक्षपदी महाविकास आघाडीच्या शेकाप–काँग्रेस समर्थित अक्षया नाईक यांची निवड झाली आहे. नगरसेवकांच्या २० जागांपैकी १७ जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले असून, भाजपला एक तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला दोन जागा मिळाल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर उपनगराध्यक्षपदासाठी शेकापकडून ॲड. मानसी म्हात्रे आणि भाजपकडून ॲड. अंकित बंगेरा यांनी अर्ज दाखल केले. दोन उमेदवार रिंगणात असल्याने मतदान घेण्यात आले. त्यात मानसी म्हात्रे यांना १७ मते, तर अंकित बंगेरा यांना केवळ ३ मते मिळाली.
या सभेत शेकापचे प्रदीप नाईक आणि जमाल सय्यद यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. मात्र, उपनगराध्यक्षपदासाठीची सभा असताना स्वीकृत सदस्यांची निवड केल्याबाबत भाजपचे ॲड. अंकित बंगेरा यांनी आक्षेप नोंदवला.
निवडीनंतर नगराध्यक्षा अक्षया नाईक आणि शेकाप गटनेते प्रशांत नाईक यांनी ॲड. मानसी म्हात्रे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार व अभिनंदन केले. अलिबागच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा निर्धार यावेळी मानसी म्हात्रे यांनी व्यक्त केला.









