अलिबाग (प्रतिनिधी): क्षौत्रक्य समाज अलिबागचा रौप्यमहोत्सवी वर्धापनदिन मोठ्या उत्साहात कुरूळ येथील क्षौत्रक्य समाज हॉलमध्ये साजरा करण्यात आला. समाजाच्या स्थापनेला पंचवीस वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित या सोहळ्यास समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व समाजगीताने करण्यात आली.
या प्रसंगी समाजातील जेष्ठ मान्यवर तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. शिक्षण, सामाजिक कार्य, राजकारण, प्रशासन व व्यवसाय क्षेत्रात समाजाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचा गौरव करत त्यांना शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष श्रीम. सुनिता नाईक, विद्यमान नगराध्यक्ष कु. अक्षया नमिता प्रशांत नाईक, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक श्री. प्रशांत मधुसूदन नाईक, आवास गावचे सरपंच श्री. अभिजीत राणे , माजी नगरसेवक श्री. प्रदीप नाईक, मा. श्री कबन अण्णा नाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांनी आपल्या भाषणातून समाजाच्या एकतेवर, संस्कार जपण्यावर व भावी पिढीच्या सर्वांगीण विकासावर भर दिला.
कार्यक्रमाच्या शेवटी समाजाच्या भावी उपक्रमांची माहिती देण्यात आली. रौप्यमहोत्सवी वर्धापनदिनाच्या निमित्ताने समाजातील बंधुता अधिक दृढ होऊन सामाजिक कार्यासाठी नवी दिशा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.









