अलिबाग (प्रतिनिधी): स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय)ही देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. या बँकेकडून रायगड जिल्हा परिषदेच्या कर्मचा-यांसाठी विशेष सुविधा पुरविल्या जाणार आहेत. यासाठीचा करार सोमवारी ता.12 रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यामुळे राजिपच्या कर्मचा-यांना विविध सुविधा उपलब्ध होणार आहेत.
एसबीआय बॅंकेतर्फे राज्य शासन वेतन खाते योजनेतून रायगड जिल्हा परिषदेच्या कर्मचा-यांना विशेष लाभ देण्यात येणार आहे. यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पगार खाते शून्य शिल्लक ठेवून उघडले जाते. खातेधारकांना मोफत वैयक्तिक अपघात विमा मिळतो. ज्यामध्ये 1 कोटी 10 लाख रुपयांपासून कमाल 2 कोटी 60 लाखांपर्यंत विमा संरक्षण उपलब्ध आहे. तसेच यात मोफत हवाई अपघात विम्याचा लाभदेखील दिला जातो. कायमस्वरूपी अंशतः अपंगत्व आल्यास अपंगत्व टक्केवारीनुसार 80 लाखांपर्यंत व कायमस्वरूपी पूर्ण अपंगत्व आल्यास 1 कोटी, त्याचप्रमाणे सवलतीच्या दरात आरोग्य विमा 55 लाखांपर्यंत मिळतो. यामध्ये पगार खातेधारकासह जोडीदार, दोन अपत्यांचा समावेश आहे. ग्राहक एसबीआय बँकेच्या कोणत्याही एटीएममधून मोफत पैसे काढू शकतात. तसेच ग्राहकांना कार लोन, होम लोन, पर्सनल लोनवर अतिरिक्त फायदेदेखील मिळतात. एसबीआयच्या योजनेनुसार बँक खात्यात 1 लाख रुपयांपेक्षा जास्त मासिक पगार असलेले लोक बँकेत प्लॅटिनम सॅलरी खाते उघडू शकतात. 50 हजार ते 1 लाख रुपये मासिक पगार असलेले डायमंड, 25 हजार ते 50 हजार रुपये पगार असलेले गोल्ड खाते आणि 10 हजार ते 25 हजार रुपये पगार असलेले सिल्व्हर खाते आणि 2 लाख पेक्षा पगार खात्यात जमा होणारे रोडियम खाते उघडू शकतात. याचा फायदाच जिल्हा परिषदेच्या कर्मचारी, अधिका-यांना होणार आहे. त्यामुळे याबाबतचा करार सोमवारी करण्यात आला. राजिपच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनीदेखील एसबीआयच्या या उपक्रमाचे कौतुक केले.
या कराराच्या वेळी राजिप वित्त विभागाचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहूल कदम, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जालिंदर पठारे, एसबीआयचे रिजनल मॅनेजर विलास शिंदे, एजीएम रणजीत मिश्रा, एजीएम देवेंद्र यादव, चिफ मॅनेजर प्रकाश तांबे, अलिबाग शाखेचे चिफ मॅनेजर सुमित म्हात्रे, चिफ मॅनेजर धिरेंद्र कुमार, डिस्ट्रीक्ट को-ऑर्डीनेटर रायगड संजय गोळे यांच्यासह राजिप. व बँकेचे इतर कर्मचारी उपस्थित होते.
*******
एसबीआय पगार खात्याचे अतिरिक्त विशेष फायदे:
– झिरो बॅलन्स खाते (किमान शिल्लक आवश्यक नाही)
– रिश्ते फॅमिली सेव्हिंग अकाउंट 4 कुटुंबियांपर्यंत खाते सुविधा
– लॉकर भाड्यात वार्षिक 50 टक्केपर्यंत सूट
– इतर बँक एटीएमवर दरमहा 10 मोफत व्यवहार
– पेन्शन घेणा-या शासकीय एसबीआय पेन्शनधारकांसाठी विशेष पेन्शन पॅकेज
– दररोज रोख पैसे काढण्याची मर्यादा खाते प्रकारानुसार जास्तीत जास्त 2 लाखांपर्यंत.









