रायगड (प्रतिनिधी): रायगड जिल्हा पोलीस दलाच्या श्वान पथकातील निष्ठावान श्वान मॅक्स याचे उपचारादरम्यान दुर्दैवी निधन झाले. मॅक्सच्या निधनाने रायगड जिल्हा पोलीस दलावर तसेच सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांवर शोककळा पसरली आहे.
मॅक्स हा केवळ एक श्वान नव्हता, तर तो पोलीस दलाचा खरा सहकारी होता. गुन्हे उकल, शोधमोहीम, संशयितांचा माग काढणे तसेच विविध कठीण परिस्थितींमध्ये मॅक्सने आपल्या तीक्ष्ण बुद्धी, चपळता आणि निष्ठेच्या जोरावर अनेक वेळा महत्त्वाची कामगिरी बजावली. त्याच्या कार्यामुळे अनेक गुन्ह्यांची उकल होऊन आरोपींना पकडण्यात यश आले होते. त्यामुळे मॅक्सने पोलीस दलाचा विश्वास संपादन केला होता.
उपचारादरम्यान त्याला वाचविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले; मात्र नियतीसमोर ते अपुरे ठरले. मॅक्सच्या निधनामुळे पोलीस दलाने एक निष्ठावान, कर्तव्यदक्ष आणि धाडसी सहकारी गमावला आहे.
मॅक्सच्या कार्याची व सेवेची कायम आठवण राहील. रायगड जिल्हा पोलीस दलाकडून त्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत असून, त्याच्या आत्म्यास शांती लाभो, हीच प्रार्थना.









