रायगडमध्ये राष्ट्रवादी–भाजप युतीची शक्यता; शिंदे गटासोबत युती नाही – सुनील तटकरे


रायगड (प्रतिनिधी): रायगड जिल्ह्यातील आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये शिवसेना (शिंदे गट) सोबत युती केली जाणार नसल्याचे स्पष्ट संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी दिले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पुढील टप्प्यातील निवडणुकांसाठी भाजपसोबत चर्चा सुरू असून त्या अंतिम टप्प्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

रायगड जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या दहा नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये महायुतीतील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले होते. शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात समन्वय न झाल्याने अनेक ठिकाणी महायुती अस्तित्वात येऊ शकली नाही. परिणामी घटक पक्ष एकमेकांच्या विरोधात थेट निवडणूक रिंगणात उतरले.

या निवडणुकांदरम्यान महाड येथे दोन्ही पक्षांतील वाद हाणामारीपर्यंत गेले, तर खोपोली येथे राजकीय वादातून शिवसेनेच्या कार्यकर्त्याची हत्या झाल्याची गंभीर घटना घडली. या घटनांमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण अधिकच तणावपूर्ण झाले होते.

या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांतील युतीबाबत विचारणा केली असता, खासदार सुनील तटकरे यांनी शिवसेना शिंदे गटाशी युती न करण्याची ठाम भूमिका मांडली. त्यामुळे आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि भाजप यांची युती विरुद्ध शिवसेना शिंदे गट असा थेट सामना रंगण्याची शक्यता बळावली आहे.

रायगड जिल्हा परिषदेच्या एकूण ५९ जागांसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून ७ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून सर्वच पक्षांकडून रणनीती आखण्यास सुरुवात झाली आहे.