सासवणेतील सरकारी जमिनी लाटण्याचा डाव उधळला; ग्रामस्थांचा तीव्र विरोध


अलिबाग (प्रतिनिधी): अलिबाग तालुक्यातील सासवणे गावातील समुद्रकिनारी असलेली मोक्याची सरकारी जमीन काही धनदांडग्यांच्या घशात घालण्याचा कट रचण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकरणी ग्रामस्थांनी एकजुटीने आक्रमक भूमिका घेत अतिक्रमणाचा प्रयत्न उधळून लावला आहे.
सासवणे समुद्रकिनारी असलेली ही जागा गावाच्या मालकीची असून स्थानिक ग्रामस्थ व कोळी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. मात्र, एका उद्योगपतीने या जागेवर बेकायदेशीर अतिक्रमण केल्याचे निदर्शनास येताच ग्रामस्थांनी तात्काळ आक्षेप घेतला. आज ग्रामस्थांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता सदर अतिक्रमण स्पष्ट दिसून आले. त्यानंतर ग्रामस्थांच्या दबावामुळे संबंधितांना अतिक्रमण काढण्यास भाग पाडण्यात आले.
या संपूर्ण प्रकारात ग्रामपंचायतीला अंधारात ठेवून परस्पर ही जमीन उद्योगपतीच्या घशात घालण्याचा डाव वरिष्ठ पातळीवरून आखण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणी ग्रामपंचायतीनेही आपली भूमिका स्पष्ट करत सदर अतिक्रमणास तीव्र आक्षेप नोंदवला आहे.
ग्रामस्थांनी सांगितले की, हीच जागा स्थानिक कोळी बांधवांना वापरासाठी दिल्यास ते येथे मत्स्य व्यवसाय व संबंधित उद्योग उभारू शकतात, ज्यामुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. मात्र बाहेरील भांडवलदारांच्या फायद्यासाठी सरकारी जमीन बळकावण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे चित्र आहे.
सध्या अलिबाग तालुक्यातील जमिनींना सोन्याचा भाव आलेला असताना सरकारी जमिनी लाटण्याचे षडयंत्र अधिक तीव्र झाले आहे. कोणत्याही परिस्थितीत या जागेवर बाहेरील भांडवलदारांना पाय ठेवू देणार नाही, असा ठाम इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. ग्रामस्थांचा हा लढा भविष्यातही सुरूच राहील, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.