युतीबाबत भाजपची सावध भूमिका; योग्य प्रस्ताव स्वीकारणाऱ्या पक्षासोबतच युती – सतीश धारप


अलिबाग (प्रतिनिधी): भाजप जिल्हा महामंत्री सतीश धारप यांनी आगामी राजकीय रणनीतीबाबत महत्त्वपूर्ण भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांना युतीसंदर्भात प्रस्ताव पाठविण्यात आले असून, जो प्रस्ताव भाजपला योग्य आणि हितावह वाटेल, तो स्वीकारणाऱ्या पक्षासोबत युती करण्याचे धोरण पक्षाने ठरविले आहे.
धारप यांनी स्पष्ट केले की, भाजप कोणत्याही घाईघाईने निर्णय घेणार नसून, सर्वसमावेशक चर्चा करूनच पुढील पावले उचलली जातील. सध्या मतदारसंघनिहाय पदाधिकाऱ्यांच्या बैठका सुरू असून, या बैठकींत स्थानिक परिस्थिती, कार्यकर्त्यांचे मत, जनतेचा कल तसेच आगामी निवडणुकांमधील शक्यता यावर सविस्तर चर्चा केली जात आहे.
या बैठकींच्या माध्यमातून कार्यकर्त्यांच्या भावना आणि सूचना जाणून घेतल्या जात असून, त्यांचा विचार करूनच अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. भाजप संघटनात्मक पातळीवर मजबूत असून, स्थानिक कार्यकर्त्यांचा आवाज पक्षाच्या निर्णयप्रक्रियेत महत्त्वाचा आहे, असेही धारप यांनी नमूद केले.
आगामी काळात कोणत्या पक्षासोबत युती होणार, याबाबत उत्सुकता असली तरी भाजपचा निर्णय कार्यकर्ते आणि मतदारांच्या हिताचा विचार करूनच घेतला जाईल, असे सतीश धारप यांनी स्पष्ट केले.