अलिबाग (प्रतिनिधी): शेकापचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या रामराजमध्ये मोठा राजकीय भूकंप होण्याची चिन्हे दिसत आहेत. शेकडो कार्यकर्त्यांसह येत्या २३ तारखेला शिंदे गटाच्या शिवसेनेत पक्षप्रवेश होणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यामुळे शेकापला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रामराज हा परिसर गेली अनेक वर्षे शेतकरी कामगार पक्षाचा मजबूत आधार मानला जातो. मात्र अलीकडील काळात स्थानिक नेतृत्वावर नाराजी, विकासकामांचा अभाव आणि संघटनात्मक दुर्बलता यामुळे कार्यकर्त्यांमध्ये असंतोष वाढत असल्याचे चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते पर्यायी राजकीय वाट शोधत असल्याची माहिती समोर येत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, या संभाव्य पक्षप्रवेशासाठी शिंदे गटाकडून जोरदार तयारी सुरू असून, वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. शेकडो कार्यकर्ते एकाच वेळी शिवसेनेत प्रवेश केल्यास स्थानिक राजकारणाची गणिते बदलू शकतात.
दरम्यान, शेकापच्या नेत्यांकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली तरी पक्षांतर्गत हालचालींना वेग आला आहे. २३ तारखेला नेमके काय घडते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
Home ताज्या बातम्या शेकापच्या बालेकिल्ल्यात राजकीय भूकंप? रामराजमधील शेकडो कार्यकर्ते २३ला शिंदे शिवसेनेत प्रवेशाच्या तयारीत









