जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगडमध्ये शिवसेनेचा भाजपला मोठा धक्का; आंबेपूरमध्ये शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश


अलिबाग (प्रतिनिधी): जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर होताच रायगड जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले असून, विविध पक्षांत हालचालींना वेग आला आहे. अलिबाग तालुक्यातील आंबेपूर मतदारसंघात भाजपला मोठा धक्का बसला असून, भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा व या मतदारसंघातील संभाव्य उमेदवार चित्रा ताई पाटील यांना मित्रपक्ष शिवसेनेने मोठे खिंडार पाडले आहे.
चित्रा पाटील यांच्या कट्टर समर्थक तसेच कुसुंबळे ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच प्रतीक्षा पाटील, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य बजरंग पाटील यांच्यासह भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे आंबेपूर मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शिवसेना नेत्या मानसी दळवी व रायगड जिल्हा प्रमुख राजा केणी यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात नव्या कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले. यावेळी आंबेपूर मतदारसंघातील शिवसेनेच्या उमेदवार रसिका केणी, जीवन पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
आमदार महेंद्र दळवी व जिल्हा प्रमुख राजा केणी यांच्या कार्यपद्धतीने प्रभावित होऊन आपण शिवसेनेत प्रवेश केल्याचे बजरंग पाटील यांनी सांगितले. यावेळी मारुती पाटील, सचिन पाटील, सुशील पाटील, विद्याधर पाटील, गजानन पाटील, नरेंद्र पाटील, सुशांत पाटील, चैतन्य पाटील, हर्ष पाटील, वंदना पाटील, समीक्षा पाटील, आशा पाटील, धन्यता पाटील, अरविंद कोठेकर, विनय पाटील आदींनीही शिवसेनेत प्रवेश केला. या घडामोडींमुळे जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे पारडे जड झाल्याचे चित्र दिसत आहे.