महापौर पदाचा वाद अखेर मिटला; गुप्त बैठकीत भाजपा–शिवसेनेत तोडगा


मुंबई (धनश्री रेवडेकर) : २९ महानगरपालिकांपैकी २३ ठिकाणी महायुतीची सत्ता निश्चित राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून, त्यामध्ये तब्बल २३ महानगरपालिकांमध्ये महायुतीची सत्ता स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निकालांमुळे राज्याच्या राजकारणात भाजपने आपली ताकद दाखवत ‘अश्वमेध’ उधळल्याचे चित्र आहे.

विशेषतः आशियातील सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्याने आता महापौर कोण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबई महानगरपालिकेचा महापौर हा ‘मुंबईचा प्रथम नागरिक’ मानला जात असल्याने हे पद अत्यंत मानाचे समजले जाते. गेल्या सलग २५ वर्षांपासून उद्धव ठाकरे यांच्या अविभक्त शिवसेनेचा महापौर मुंबई महानगरपालिकेत विराजमान होता. मात्र, बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे यावेळी चित्र वेगळे आहे.

दरम्यान, शिवसेना नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल अचानक शिवसेनेचे २९ नगरसेवक वांद्रे येथील ताज लँड एण्ड हॉटेलमध्ये हलवल्याने राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले. या घडामोडीनंतर मुंबई तसेच ठाणे जिल्ह्यातील महानगरपालिकांतील सत्तास्थापनेबाबत हालचालींना वेग आला आहे. पक्षश्रेष्ठींच्या चर्चेनंतर मुंबईतील तिढा सुटण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसत आहेत.

कल्याण–डोंबिवली व उल्हासनगरवर लक्ष
मुंबईलगतच्या कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेत महापौर कोणाचा होणार, याचाही निर्णय लवकरच होणार आहे. यासंदर्भात भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात गुप्त बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीत

कल्याण–डोंबिवली तसेच उल्हासनगर महानगरपालिकेतील सत्तास्थापनेवर सविस्तर चर्चा झाल्याचे समजते.
कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेत भाजपला ५१ तर शिवसेनेला ५२ जागा मिळाल्या आहेत. दोन्ही पक्षांकडे जवळपास समान संख्याबळ असल्याने येथे महायुतीच्या माध्यमातून सत्ता स्थापन करण्यावर एकमत झाल्याची चर्चा आहे. भाजप आणि शिवसेना एकत्र येऊन सत्ता स्थापन करणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांकडे
कल्याण–डोंबिवली आणि उल्हासनगर महानगरपालिकांबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. वरिष्ठ पातळीवरून हिरवा कंदील मिळताच महापौर व इतर पदांची घोषणा केली जाणार आहे.

उल्हासनगरमध्ये सत्ता येणार ?

उल्हासनगर महानगरपालिकेत भाजप आणि शिवसेना स्वतंत्रपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. येथे भाजपला ३८ तर शिवसेनेला ३६ जागा मिळाल्या आहेत. शिवसेना स्थानिक आघाडीच्या मदतीने लढली होती. संख्याबळ लक्षात घेता, येथेही भाजप–शिवसेना मिळून सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे.
एकूणच, राज्यातील महानगरपालिकांमध्ये महायुतीची पकड अधिक मजबूत होत असून, येत्या काही दिवसांत महापौरपदांचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.