अलिबाग तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल


अलिबाग (प्रतिनिधी): रायगड जिल्हा परिषदेच्या अलिबाग तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांच्या निवडणुकांसाठी शिवसेना–भाजप युतीच्या उमेदवारांनी आज आपले उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखल केले. या अर्ज दाखल प्रक्रियेमुळे तालुक्यातील राजकीय वातावरण तापले असून निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्याचे चित्र आहे.
जिल्हा परिषद गटांमध्ये आंबेपूर गटातून भाजपच्या सौ. चित्रा पाटील, थळ गटातून शिवसेनेच्या सौ. मानसी दळवी, चेंढरे गटातून सौ. आदिती अभिजित दळवी, तर कावीर गटातून अनंत गोंधळी यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. पंचायत समितीच्या कावीर गणातून संतोष निगडे यांनी उमेदवारी अर्ज सादर केला आहे.
या वेळी शिवसेनेचे रायगड जिल्हा प्रमुख राजा केणी, दिलीप भोईर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यानंतर पक्ष कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत उमेदवारांना शुभेच्छा दिल्या.
आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी सौ. मानसी दळवी तसेच सौ. आदिती अभिजित दळवी यांच्या उमेदवारीमुळे निवडणुकीकडे विशेष लक्ष लागले आहे. आगामी काळात प्रचाराला वेग येणार असून अलिबाग तालुक्यात चुरशीची लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.