अलिबाग (प्रतिनिधी): राज्यातील १२ जिल्हा परिषद निवडणुकांचे बिगुल वाजले असून राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. याच पार्श्वभूमीवर, अलिबाग जिल्हा परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसचे खंबीर नेतृत्व राजाभाऊ ठाकूर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज अत्यंत उत्साहात दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांच्या अफाट संख्येने विरोधकांचे धाबे दणाणले असून, राजाभाऊंच्या विजयाचा संकल्प आतापासूनच अलिबागमध्ये दिसून येत आहे.
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी राजाभाऊ जेव्हा बाहेर पडले, तेव्हा हजारो कार्यकर्त्यांनी परिसर फुलून गेला होता.राजाभाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है” अशा गगनभेदी घोषणांनी संपूर्ण अलिबाग परिसर दणाणून गेला. कार्यकर्त्यांचा हा जोश आणि राजाभाऊंवरील प्रेम पाहता, ही निवडणूक आता केवळ औपचारिक उरली असून राजाभाऊंचा विजय निश्चित मानला जात आहे.
अर्ज दाखल करताना राजाभाऊ ठाकूर यांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज आणि आत्मविश्वास पाहायला मिळाला. अलिबागच्या विकासासाठी असलेले त्यांचे व्हिजन आणि जनतेशी असलेली नाळ यामुळेच त्यांच्याकडे आज एक ‘भावी विजेता’ म्हणून पाहिले जात आहे. अलिबागचे विविध प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आणि तालुक्याचा कायापालट करण्यासाठी ते पूर्ण ताकदीनिशी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
राजाभाऊंनी नेहमीच सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली आहे. यावेळी देखील अलिबागच्या विकासाचे ठोस मुद्दे घेऊन ते जनतेसमोर जात आहेत. त्यांच्या अनुभवाचा आणि दांडगा जनसंपर्काचा फायदा अलिबागच्या जनतेला नक्कीच होईल, असा विश्वास स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
तत्पूर्वी राजाभाऊ ठाकूर यांनी आपल्या सातीर्जे गावातील गणेश मंदिरात जाऊन श्री गणरायाचे दर्शन घेतले.ज्येष्ठ नेते जगन्नाथ पेठवी यांनी नारळ वाढवला. त्यानंतर त्यांनी स्व.मधुकर ठाकूर यांच्या समाधीचे दर्शन घेतले.पुढे आवास येथील नागेश्वर मंदिर आणि रांजपाडा येथील साई मंदिरात देखील दर्शन घेतले.अलिबागेत शेकापचे सरचिटणीस आणि आघाडीचे नेते माजी आमदार जयंत पाटील यांची भेट घेतली. यावेळी राजाभाऊ ठाकूर आणि आघाडीचे कार्यकर्ते यांच्यात प्रचंड उत्साह दिसून आला.









