जिल्हा परिषद गट ४८ मधून भारत गोरेगावकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल;


रायगड (प्रतिनिधी): रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणुकांचे बिगुल वाजताच राजकीय हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) कडून जिल्हा परिषद गट क्रमांक ४८ मधून भारत गोरेगावकर यांनी आपला उमेदवारी अर्ज अधिकृतरीत्या दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करताना पक्ष कार्यकर्ते, समर्थक आणि युवकांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली.
भारत गोरेगावकर हे सर्वसामान्यांच्या सुख-दुःखात धावून जाणारे, अडीअडचणीच्या काळात मदतीला उभे राहणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे त्यांना युवकांचा भक्कम पाठिंबा लाभला असून ग्रामीण भागातही त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. विविध गावांतील नागरिकांशी थेट संवाद, स्थानिक प्रश्नांची जाण आणि सातत्याने केलेले सामाजिक कार्य यामुळे भारत गोरेगावकर यांची ओळख एक विश्वासार्ह उमेदवार म्हणून निर्माण झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून गट ४८ साठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, येत्या निवडणुकीत हा गट काबीज करण्यासाठी पक्षाकडून जोरदार तयारी सुरू असल्याचे चित्र आहे. भारत गोरेगावकर यांच्या उमेदवारीमुळे गट ४८ मधील निवडणूक लढत चुरशीची होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.