सोलापूर (प्रतिनिधी): सोलापूर जिल्ह्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या जिल्हा संपर्कप्रमुखपदी शिवसेना उपनेत्या सौ. सुषमा अंधारे यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. माननीय शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख श्री. उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली असून, याबाबतची अधिकृत माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.
सौ. सुषमा अंधारे या पक्षाच्या आक्रमक भूमिका, सामाजिक प्रश्नांवरील ठाम मतप्रदर्शन आणि संघटन कौशल्यासाठी ओळखल्या जातात. त्यांच्या नियुक्तीमुळे सोलापूर जिल्ह्यात पक्षसंघटना अधिक बळकट होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. आगामी काळात जिल्ह्यातील संघटनात्मक बांधणी, कार्यकर्त्यांशी थेट संवाद, तसेच जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी त्या प्रभावीपणे कार्य करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सोलापूर जिल्ह्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी ही नियुक्ती महत्त्वाची ठरणार असून, पक्षाच्या धोरणांचा आणि नेतृत्वाचा प्रभाव तळागाळापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी सौ. अंधारे पार पाडतील, असेही या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
ही माहिती शिवसेना नेते व सचिव खासदार अनिल देसाई यांनी दिली आहे.









