आदर्श पतसंस्थेने एक हजार कोटी एकत्रीत व्यवसायाचा टप्पा ओलांडल.


अलिबाग (प्रतिनिधी): आदर्श नागरी सहकारी पतसंस्था, अलिबाग या संस्थेने एक हजार कोटी रुपयांचा एकत्रित व्यवसायाचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला असून, असा विक्रम करणारी रायगड जिल्ह्यातील ही पहिली पतसंस्था ठरली आहे. ही माहिती संस्थेचे संस्थापक सुरेश पाटील आणि अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी बुधवार (दि. 21) रोजी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

1998 साली स्थापन झालेल्या आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेने अवघ्या 27 वर्षांत उल्लेखनीय प्रगती साधत 1003 कोटी रुपयांचा एकत्रित व्यवसाय पूर्ण केला आहे. सध्या संस्थेच्या ठेवी 558 कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्या असून, 445 कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. सन 2024-25 या आर्थिक वर्षअखेरपर्यंत संस्थेचा एकत्रित व्यवसाय 752 कोटी 77 लाख रुपये इतका होता. मार्च 2026 पर्यंत 1000 कोटी रुपयांचा व्यवसाय करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र सभासदांनी संस्थेवर दाखवलेल्या अतूट विश्वासामुळे अवघ्या दहा महिन्यांतच 250 कोटी रुपयांची वाढ होऊन आज संस्थेचा व्यवसाय 1003 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

एक हजार कोटींपेक्षा अधिक व्यवसाय असूनही संस्थेचे ग्रॉस एनपीए प्रमाण 1 टक्क्यांपेक्षा कमी आहे. त्यामुळे राज्यातील अग्रगण्य व आर्थिकदृष्ट्या सक्षम पतसंस्थांमध्ये आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचा समावेश होत आहे.

आदर्श पतसंस्थेचे कार्यक्षेत्र राज्यस्तरीय असून रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पुणे आणि मुंबई या जिल्ह्यांत संस्थेची कामकाजाची व्याप्ती आहे. सध्या संस्थेच्या एकूण 22 शाखा कार्यरत असून त्यामध्ये एक स्वतंत्र गोल्ड कर्ज शाखाही सुरू करण्यात आली आहे. पुण्यातील दोन शाखांपैकी एका पतसंस्थेचे यशस्वी विलीनीकरण करण्यात आले असून सर्वच शाखा नफ्यात कार्यरत आहेत. सर्व शाखांच्या व्यवसायात सातत्याने वाढ होत असल्यानेच हा ऐतिहासिक टप्पा गाठता आल्याचे संस्थापक सुरेश पाटील यांनी सांगितले. भविष्यात राज्यातील पहिल्या पाच पतसंस्थांमध्ये आदर्शला स्थान मिळवून देण्याचे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी नमूद केले.

कर्जवसुलीच्या बाबतीत कोणतीही तडजोड न करता शिस्तबद्ध धोरण राबवण्यात आले. आदर्श परिवारातील प्रत्येक कर्मचाऱ्याने स्वतःला झोकून देत प्रामाणिकपणे काम केल्यामुळेच हे यश मिळू शकले, असे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी सांगितले. आदर्श पतसंस्था वित्तीयदृष्ट्या सुदृढ आणि सुव्यवस्थापित (एफएसडब्ल्यूएम) असून 31 मार्च 2026 पर्यंत ग्रॉस एनपीए 1 टक्क्यांपेक्षा कमी ठेवण्याचा संस्थेचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सर्व शाखांतील कर्मचाऱ्यांनी ठेवी संकलन, कर्जवाटप व वसुली, तसेच ग्राहकसेवेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. सध्याच्या काळात पतसंस्थांबाबत अविश्वासाचे वातावरण असतानाही आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेवर मात्र ग्राहकांचा विश्वास अधिक दृढ होत आहे. त्यामुळे संस्थेच्या व्यवसायात झपाट्याने वाढ होत असून आदर्श पतसंस्था विश्वासार्हतेचे प्रतीक बनली आहे, असे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी सांगितले.