भाजपच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेचा झेंडा; राजाभाई केणी यांचा गणेश मंदिरात नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ


अलिबाग(प्रतिनिधी): भाजप महिला जिल्हाध्यक्ष चित्रा पाटील यांच्या बालेकिल्ल्यात आज शिवसेना जिल्हाप्रमुख राजाभाई केणी यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपल्या प्रचाराची अधिकृत सुरुवात केली. या प्रचाराचा शुभारंभ पारंपरिक पद्धतीने गणेश मंदिरात नारळ फोडून करण्यात आला. यावेळी परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
प्रचाराच्या प्रारंभीच राजाभाई केणी यांना स्थानिक नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिकांनी उपस्थित राहून उघडपणे शिवसेनेला आपला पाठिंबा जाहीर केला. विशेष म्हणजे भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या परिसरात झालेल्या या कार्यक्रमामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
राजाभाई केणी यांनी यावेळी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, “सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी आणि विकासासाठी शिवसेना नेहमीच लढत राहिली आहे. जनतेचा विश्वास हीच आमची खरी ताकद आहे.” त्यांनी आगामी काळात विकास, रोजगार आणि मूलभूत सुविधांसाठी ठोस भूमिका घेण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमानंतर परिसरात राजाभाई केणी यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. या प्रचाराच्या शुभारंभामुळे आगामी राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.