जंजिरा मुक्ती संग्राम दिन शासकीय पातळीवर साजरा करण्याची मागणी


रायगड प्रेस क्लब व मुरूड तालुका पत्रकार संघाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
अलिबाग (प्रतिनिधी): जंजिरा संस्थान भारतात विलीन झाल्याच्या ऐतिहासिक घटनेला स्मरणार्थ साजरा होणारा जंजिरा मुक्ती संग्राम दिन दि. ३१ जानेवारी रोजी शासकीय पातळीवर साजरा करण्यात यावा, अशी मागणी रायगड प्रेस क्लब व मुरूड तालुका पत्रकार संघाने केली आहे. याबाबतचे सविस्तर निवेदन जिल्हाधिकारी रायगड यांना सादर करण्यात आले आहे.
दि. ३१ जानेवारी १९४८ रोजी जंजिरा संस्थान भारतात विलीन झाले होते. तत्कालीन जंजिरा संस्थानिक (नवाब) यांनी भारत सरकारसोबत Instrument of Accession वर स्वाक्षरी केल्यानंतर जंजिरा संस्थान स्वतंत्र भारताचा अविभाज्य भाग बनले. या ऐतिहासिक निर्णयामुळे जंजिरा संस्थानाची स्वतंत्र सत्ता समाप्त होऊन भारतीय संघराज्यात त्याचे अधिकृत विलिनीकरण झाले होते.
या पार्श्वभूमीवर, गेल्या पंधरा वर्षांपासून रायगड प्रेस क्लब व मुरूड तालुका पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने जंजिरा मुक्ती संग्राम दिन स्थानिक पातळीवर साजरा केला जात आहे. मात्र, मराठवाडा मुक्ती संग्राम दिन (दि. १७ सप्टेंबर) प्रमाणेच जंजिरा मुक्ती संग्राम दिनालाही शासकीय मान्यता देऊन शासन स्तरावर साजरा करण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या दिनास शासकीय मान्यता मिळाल्यास रायगड जिल्ह्याच्या इतिहासाला योग्य तो सन्मान मिळेल, तसेच नव्या पिढीमध्ये स्वातंत्र्यलढ्याची जाणीव व राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृद्धिंगत होईल, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. यासंदर्भात अधिकृत नोंद असलेली रायगड गॅझेटियरची प्रतही प्रशासनाकडे सादर करण्यात आली आहे.
या मागणीवर जिल्हा प्रशासन सकारात्मक निर्णय घेईल, अशी अपेक्षा रायगड प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष भारत रांजणकर व मुरूड तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष अमुलकुमार जैन यांनी व्यक्त केली आहे.