अलिबाग (प्रतिनिधी): सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे कोकणातील समुद्रकिनाऱ्यांवर पुन्हा एकदा पर्यटकांची मोठी गर्दी उसळली आहे. शनिवार-रविवारासह प्रजासत्ताक दिनाची सुट्टी लागून आल्याने रायगड जिल्ह्यातील बहुतांश पर्यटनस्थळे पर्यटकांनी फुलून गेली आहेत. अलिबाग, मुरूड, नागाव, काशिद, मांडवा, आवास, किहीम, दिवेआगर, श्रीवर्धन व हरिहरेश्वर येथील समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ पाहायला मिळत आहे.

अलिबाग व मुरूड ही पर्यटकांची नेहमीच पसंतीची ठिकाणे असून, मांडवामार्गे जलप्रवास करत अनेक पर्यटक दाखल झाले आहेत. सागरी प्रवासाचा आनंद घेत पर्यटकांनी निसर्गसौंदर्याचा मनमुराद आस्वाद घेतल्याचे चित्र दिसत आहे. काही पर्यटकांनी दोन-तीन दिवस मुक्काम करण्यासाठी आगाऊ नियोजन केल्यामुळे हॉटेल्स, रिसॉर्ट्स, लॉज तसेच होमस्टे येथे मोठ्या प्रमाणात खोल्यांचे आरक्षण झाले असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. मात्र, काही नागरिकांनी वनडे पिकनिकला अधिक पसंती दिल्याचेही निदर्शनास आले आहे.

समुद्रस्नानासोबतच एटीव्ही राईड, जेट स्की, बनाना राईड यांसारख्या विविध वॉटर स्पोर्ट्सकडे पर्यटकांचा मोठा ओढा दिसून आला. या साहसी खेळांचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांनी रांगा लावल्या होत्या. तसेच उंटसवारी, घोडागाडी यामुळे लहान मुलांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

पर्यटन केंद्रांवर सुरक्षितता व सुविधा यासाठी व्यावसायिकांनी तयारी केली असून, येत्या तीन दिवसांत सुमारे ३० ते ३५ हजार पर्यटक रायगड जिल्ह्यात दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर अलिबाग येथे समुद्रकिनारी चार दिवसीय पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, त्यामुळे पर्यटकांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

एकूणच सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी कोकण किनारपट्टीवर पर्यटकांची गर्दी वाढली असून, त्यामुळे स्थानिक पर्यटन व्यवसायाला चालना मिळत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.









