अलिबाग( प्रतिनिधी): दिनांक २२ ते २६ जानेवारी २०२६ दरम्यान अलिबाग येथील आरसीएफ क्रीडा संकुलात पार पडलेल्या १५ व्या व १६ व्या राष्ट्रीयस्तरीय फिल्ड आर्चरी (धनुर्विद्या) स्पर्धेत रायगड जिल्ह्याच्या युवा धनुर्धरांनी उल्लेखनीय कामगिरी करत राष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटवला.
ही राष्ट्रीयस्तरीय स्पर्धा फिल्ड आर्चरी असोसिएशनचे राष्ट्रीय महासचिव सुभाषचंद नायर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महाराष्ट्र राज्याचे सहसचिव संतोष जाधव यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीरीत्या आयोजित करण्यात आली होती. देशभरातून मोठ्या संख्येने खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता.
या स्पर्धेत कु. अवनीश विकास गोगावले (वयोगट १०) हिने अप्रतिम अचूकता दाखवत फाइव स्पॉट इवेंटमध्ये वैयक्तिक सुवर्ण पदक, तसेच सांघिक प्रकारात सुवर्ण पदक पटकावले. याशिवाय नाईन स्पॉट इवेंटमध्येही वैयक्तिक सुवर्ण पदक जिंकत तिने त्रिगुणी सुवर्ण कामगिरी केली.
त्याचप्रमाणे कु. अद्विक विकास गोगावले (वयोगट १०) याने सिंगल स्पॉट इवेंटमध्ये वैयक्तिक सुवर्ण पदक, सांघिक प्रकारात सुवर्ण पदक, तर नाईन स्पॉट इवेंटमध्ये वैयक्तिक रौप्य पदक मिळवत दमदार कामगिरी केली.
या यशामुळे रायगड जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात अभिमानाची भावना निर्माण झाली असून, प्रशिक्षक, पालक व क्रीडाप्रेमींनी दोन्ही खेळाडूंचे कौतुक केले आहे.









