अलिबाग(प्रतिनिधी): महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक जीवनावर शोककळा पसरवणारी अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. अजितदादांच्या विमान अपघातातील अकाली निधनाने संपूर्ण राज्य हादरून गेले असून, महाराष्ट्र जणू पोरका झाल्याची भावना व्यक्त होत आहे. सामान्य जनतेपासून थोर नेत्यांपर्यंत प्रत्येकासाठी तत्परतेने काम करणारा एक लोकाभिमुख जनसेवक काळाने हिरावून नेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
या दुःखद घटनेचा मोठा धक्का राजकीय वर्तुळाला बसला असून, राजाभाऊ ठाकूर यांनाही आपल्या लाडक्या नेत्याच्या निधनाने तीव्र शोक झाला आहे. भावना व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे पडत असल्याचे त्यांनी सांगत, अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

आज राजाभाऊ ठाकूर यांच्या प्रचारासाठी काँग्रेसचे हर्षवर्धन सकपाळ आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील उपस्थित राहणार होते. मात्र, निधनाची बातमी मिळताच राजाभाऊ ठाकूर यांनी आपल्या सर्व प्रचार दौऱ्यांसह जाहीर सभा तात्काळ रद्द करण्याचा निर्णय घेतला.
महायुतीकडून काही ठिकाणी प्रचार सुरू असला तरी, काँग्रेस पक्षाने संवेदनशीलतेचा परिचय देत आजचे सर्व कार्यक्रम स्थगित केले आहेत. अजितदादांच्या निधनाने महाराष्ट्राने एक आदर्श नेतृत्व गमावले असून, संपूर्ण राज्य शोकसागरात बुडाले आहे.









