अलिबाग(प्रतिनिधी): राज्यासह जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी जोरात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांकडून ठिकठिकाणी प्रचार सभा, बैठका व दौऱ्यांचे आयोजन करण्यात आले होते. शेतकरी कामगार पक्ष महाविकास आघाडीच्या वतीने बुधवारी अलिबाग तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत प्रचार सभांचे नियोजन करण्यात आले होते. या सभांना शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती अपेक्षित होती.
मात्र बुधवारी (दि. २८) सकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाल्याची बातमी समजताच राजकीय वर्तुळात शोककळा पसरली. या घटनेची माहिती मिळताच शेकापचे नेते जयंत पाटील यांनी तत्काळ आपले सर्व नियोजित दौरे, बैठका व प्रचार सभा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शेतकरी कामगार पक्षाकडून आयोजित करण्यात आलेल्या सर्व प्रचार सभा रद्द करण्यात आल्या.
दरम्यान, दिवंगत अजित पवार यांना अखेरचा निरोप देण्यासाठी शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील, माजी आमदार बाळाराम पाटील यांच्यासह पक्षाचे अन्य वरिष्ठ नेते बारामती येथील विद्या प्रतिष्ठान येथे पोहोचले. अजित पवार यांच्या निधनाबद्दल शेकापकडून तीव्र शोक व्यक्त करण्यात आला असून, या दुःखद प्रसंगी पक्षाने प्रचारकार्य थांबवून संवेदनशीलतेचे दर्शन घडवले आहे.









