आंबेपूर (प्रतिनिधी): आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेनेच्या प्रचाराने चांगलाच जोर पकडला असून, शुक्रवार (ता. ३०) शहाबाज कमल पाडा येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत शिवसेनेच्या उमेदवार रसिका केणी यांना बहुमताने निवडून देण्याचे आवाहन शिवसेना नेते दिलीपशेठ (छोटमशेट) भोईर यांनी केले. या सभेला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत शिवसेनेच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी बोलताना दिलीपशेठ भोईर म्हणाले की, आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघाला विकासाची खरी दिशा देण्यासाठी आपला हक्काचा माणूस म्हणून शिवसेनेच्या उमेदवारालाच संधी देणे गरजेचे आहे. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजाभाई केणी आणि त्यांच्या पत्नी, जि.प. उमेदवार रसिका केणी या नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी २४ तास उपलब्ध असतात. त्या सातत्याने मतदारांच्या संपर्कात राहून त्यांच्या समस्या जाणून घेतात व त्या सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतात. त्यामुळे जनतेच्या हक्कासाठी काम करणाऱ्या उमेदवाराला आता बहुमताने निवडून देण्याची हीच योग्य वेळ असल्याचे त्यांनी सांगितले. भोईर यांनी यावेळी विरोधकांवरही जोरदार टीका केली. “या मतदारसंघातून पूर्वी शेतकरी पक्षात असलेले व सध्या भाजपमध्ये गेलेले काही नेते अनेक वर्षे सत्तेत होते. मात्र, सत्तेचा उपभोग घेऊनही त्यांनी मतदारसंघात ठोस विकासकामे केलीच नाहीत. रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण यांसारखे मूलभूत प्रश्न आजही जैसे थे आहेत. जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यामुळे या मतदारसंघाचा अपेक्षित विकास झाला नाही,” असा आरोप त्यांनी केला.
आंबेपूर मतदारसंघातील रखडलेले प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम, काम करणारी आणि जनतेशी थेट नाते असलेली उमेदवार आवश्यक आहे. शिवसेनेच्या उमेदवार रसिका केणी या केवळ निवडणुकीपुरत्या नव्हे, तर कायम जनतेसोबत उभ्या राहणाऱ्या नेत्या असल्याचे भोईर यांनी सांगितले. “जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होणारी आणि प्रत्येक अडचण आपली समजून सोडवणारी उमेदवार म्हणजे रसिका केणी,” असे ते म्हणाले. अलिबाग–मुरुड विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजाभाई केणी यांनी जिल्ह्यात विकासाचा धडाका लावल्याचा उल्लेखही भोईर यांनी केला. त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने विविध विकासकामे मार्गी लावली असून, त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारात शिवसेनेच्या उमेदवारांना चांगला प्रतिसाद मिळत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेचे सर्वाधिक सदस्य निवडून येतील आणि जिल्हा परिषदेत शिवसेनेची सत्ता स्थापन होईल, असा विश्वास व्यक्त करत भोईर म्हणाले की, त्या सत्तेत आंबेपूर मतदारसंघाचा हक्काचा प्रतिनिधी असणे आवश्यक आहे. यासाठीच मतदारांनी एकदिलाने रसिका केणी यांना विजयी करावे, असे आवाहन त्यांनी शेवटी केले.
सभेदरम्यान उपस्थित नागरिकांनी मोठ्या उत्साहात शिवसेनेच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडत रसिका केणी यांच्या विजयाचा निर्धार व्यक्त केला.









