अलिबाग (प्रतिनिधी) : रेवदंडा परिसरात राहणाऱ्या एका वृद्ध महिलेच्या खुनाचा गुन्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, रायगड–अलिबाग यांनी अवघ्या ४८ तासांत उघडकीस आणला आहे. तांत्रिक विश्लेषण व कसोशीनंतर या प्रकरणातील चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.
दि. २८ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास मांडवा–प्रमोद महाले (वय ७०) या वृद्ध महिला आपल्या घरात मृत अवस्थेत आढळून आल्या होत्या. अज्ञात व्यक्तींनी घरात प्रवेश करून त्यांचा जीवघेणा हल्ला करत सोन्याचे दागिने चोरल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. याप्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात दि. २९ ऑगस्ट २०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
या घटनेच्या तपासासाठी पोलीस अधीक्षक रायगड श्रीमती ऑंचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक श्री. अभिजीत शिवरकर व उपविभागीय पोलीस अधिकारी अलिबाग विभाग श्रीमती माया मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. पोलीस निरीक्षक श्री. मिलिंद खोपडे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपींचा शोध सुरू केला.
तपासादरम्यान आरोपी महादेव उर्फ शिवा राधाकिसन ढवळे (वय २५), अशोक अजिनाथ भोसलें (वय २१), गणेश उत्तम पांडाळे (वय २५) व शुभम एकनाथ पवार (वय २३) सर्व रा. जाटदेवळा, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर यांना ताब्यात घेण्यात आले आहे. प्राथमिक चौकशीत मुख्य आरोपीने वृद्ध महिलेला जिवे मारल्याची कबुली दिली आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास रेवदंडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. भैर जाधव करीत असून आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले आहे.









