अलिबाग (प्रतिनिधी): आंबेपूर-कुर्डुस जिल्हापरिषद मतदारसंघातील राजकीय वातावरण सध्या पूर्णपणे शिवसेनामय झाले आहे. शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख राजाभाई केणी यांच्या पत्नी सौ. रसिका केणी यांच्या प्रचाराने आता अंतिम टप्प्यात मोठी गती घेतली आहे. आज मतदारसंघात निघालेल्या भव्य रॅलीने विरोधकांचे धाबे दणाणले असून, ग्रामस्थांच्या उदंड प्रतिसादामुळे यावेळेस परिवर्तन अटळ असल्याचा सूर उमटत आहे.
या प्रचार रॅलीचे मुख्य आकर्षण म्हणजे पारंपारिक संस्कृतीचे जतन करत काढण्यात आलेली ‘खालूबाजा’ रॅली. ढोल-ताशांच्या आणि खालूबाजाच्या ठेक्यावर तरुणाईसह अबालवृद्धांनी ठेका धरला. विशेषतः मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला मोठ्या संख्येने रसिका ताईंच्या समर्थनासाठी रस्त्यावर उतरल्या होत्या. “रसिका ताई तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.
जिल्हाप्रमुख राजाभाई केणी यांनी आपल्या कणखर नेतृत्वाने मतदारसंघात नेहमीच जनसामान्यांची कामे केली आहेत. त्यांचा हाच वारसा रसिका केणी समर्थपणे पुढे नेत आहेत. केवळ निवडणुका डोळ्यासमोर न ठेवता, रसिका ताईंनी महिलांसाठी राबवलेले उपक्रम, आरोग्य शिबिरे आणि महिलांच्या सहलींचे आयोजन यामुळे महिला वर्गात त्यांच्याबद्दल मोठी आपुलकी आहे.
आमची ताई आमच्या सुख-दुखात नेहमी धावून येते. महिलांचे संघटन असो वा गावाचा विकास, रसिका ताईंनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. त्यामुळे यंदा त्यांनाच विजयी करण्याचा आमचा निर्धार आहे, असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.
रॅलीतील जनसमुदाय पाहता ही केवळ प्रचाराची रॅली नसून ती ‘विजयाची रॅली’ असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगली आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित राहिलेली विकासकामे आता राजाभाई आणि रसिका ताईंच्या माध्यमातून मार्गी लागतील, असा विश्वास बुजुर्गांनी व्यक्त केला. मतदारांचा हा उत्साह पाहता आंबेपूर-कुर्डुस मतदारसंघात भगवा फडकणार हे आता निश्चित मानले जात आहे.









