बॅनर फाडण्याच्या गुंडगिरीला राजाभाई केणींचे चोख प्रत्युत्तर
जनतेने निवडणूक खांद्यावर घेतल्याने विरोधक सैरभैर
गुंडगिरी बंद करा,लोकशाहीने लढा! राजाभाई केणींचा विरोधकांना सडेतोड इशारा
बॅनर फाडणाऱ्यांवर राजाभाई केणी यांच्याकडून कारवाईची मागणी
अलिबाग (प्रतिनिधी): आंबेपूर मतदारसंघात शिवसेना (शिंदे गट) आणि महायुतीच्या उमेदवारांना मिळणारा प्रचंड जनप्रतिसाद पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. लोकशाहीच्या मार्गाने लढा देण्याऐवजी आता विरोधकांनी ‘बॅनर फाडण्या’सारख्या नीच कृत्यांचा अवलंब सुरू केला असून, आंबेपूर, पेझारी आणि पोयनाड परिसरात शिवसेनेचे बॅनर फाडून निवडणुकीला गालबोट लावण्याचे काम भाजपाच्या (विरोधकांच्या) कार्यकर्त्यांकडून होत असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख राजाभाई केणी यांनी केला आहे.
राजाभाई केणी यांनी विरोधकांना कडक शब्दांत सुनावले की, “आम्ही अनेक निवडणुका पाहिल्या आहेत, जय-पराजय पचवला आहे. पण कधीही खालच्या पातळीवर जाऊन विरोधकांचे बॅनर फाडण्याचे कृत्य केले नाही. ज्यांना हा मतदारसंघ आपला ‘बालेकिल्ला’ वाटत होता, त्यांना आता जनतेचा कल पाहून धडकी भरली आहे. बॅनर फाडल्याने जनतेच्या मनातील आमचे स्थान पुसता येणार नाही.
निवडणूक आता केवळ आमची उरलेली नाही, तर आंबेपूरची जनता आणि लाडक्या बहिणींनी ही निवडणूक स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे. गावोगावी जनताच शिवसेनेचा प्रचार करत आहे. आम्ही ही लढाई अत्यंत खिलाडूवृत्तीने आणि लोकशाही मार्गाने लढत आहोत, मात्र विरोधक गुंडगिरीवर उतरले आहेत. जनतेने मनात आणलंय की यंदा परिवर्तन घडवायचं, आणि ते नक्कीच घडणार
आचारसंहितेचा भंग करून मतदारसंघात दहशतीचे वातावरण निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी राजाभाई केणी यांनी तात्काळ पावले उचलली आहेत. त्यांनी पोयनाड पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधून या सर्व प्रकरणाची माहिती दिली आहे. कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणाऱ्या गुंडांवर तात्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
विरोधकांना माझा सल्ला आहे की, गुंडगिरी बंद करा. निवडणुकीत हार-जीत होतच असते, त्याला धैर्याने सामोरे जा. बॅनर फाडण्यापेक्षा कामाच्या जोरावर मते मागा.. आणि जिंकून या…









