स्पर्श’ अभियानांतर्गत कुष्ठरोग जनजागृतीसाठी अलिबागमध्ये रॅली


अलिबाग(प्रतिनिधी): कुष्ठरोगासंदर्भात समाजात असणारा गैरसमज दूर करण्यासाठी तसेच कुष्ठरूग्णांबाबत समाजात सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी जिल्हाधिकारी किशन जावळे व रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. निशिकांत पाटील यांच्या सहकार्याने सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) तथा जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. प्राची नेहूलकर यांच्या वतीने महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून गुरुवारी (ता.5) रॅली काढण्यात आली होती.
या रॅलीमध्ये विविध संस्थांच्या प्रतिनिधींसह विभागातील अधिकारी, तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयांतील अधिकारी, कर्मचा-यांनी सहभाग घेतला. ‘स्पर्श’ कुष्ठरोग जनजागृती अभियानांतर्गत ही रॅली काढण्यात आली.
कुष्ठरोग व कुष्ठरुग्णांसंदर्भात समाजात अनेक गैरसमज आहेत. मात्र लक्षणे वेळेत ओळखल्याने व योग्य उपचार घेउन कुष्ठरोग बरा होउ शकतो. याबाबत जनजागृती करण्यासाठी आरोग्य विभागातर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच अनुषंगाने महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून गुरुवारी सकाळी जिल्हा सामान्य रुग्णालय येथून सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅली मारुती मंदिर, बालाजी नाका, महावीर चैकाकडून फुल मार्केट, छत्रपती शिवाजी महाराज चैकातून बाजारपेठेत, पोस्ट ऑफिसमार्गे पुन्हा जिल्हा सामान्य रुग्णालय येथे आली. यानंतर सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) तथा जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. प्राची नेहूलकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना, कुष्ठरोगाची लक्षणे त्वचेवर फिकट रंगाचे किंवा लालसर डाग दिसणे, त्या डागांवर स्पर्श, वेदना किंवा उष्णता जाणवत नाही. त्वचा कोरडी, कानाच्या पाळ्या जाड होणे, डागांवर घाम न येणे, हात, पाय किंवा चेह-यावर मुंग्या येणे, बधिरपणा, नसा जाड झाल्यासारख्या जाणवणे, हात-पायात कमकुवतपणा येणे, हाता-पायाची बोटे वाकडी होणे किंवा बधिर होणे, जखमा झाल्या तरी वेदना न होणे, डोळे पूर्ण नीट बंद न होणे, पापणी लुकलुकणे, चेह-यावर गाठी येणे (जुने, उपचार न घेतलेले रुग्ण), भुवया किंवा पापण्यांचे केस विरळ होणे याबाबत माहिती सांगितली. तसेच यापैकी कोणतीही लक्षणे आढळल्यास त्वरीत जवळच्या आरोग्य केंद्रात अथवा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेण्याबाबत आवाहन केले. रॅलीमध्ये ‘कुष्ठरोग हा आजार आहे, पूर्वजन्मीचा शाप नाही’, ’कुष्ठरोगींना साथ द्या’ अशा प्रकारच्या घोषणा देत जनजागृती करण्यात आली.
या रॅलीमध्ये जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. निशिकांत पाटील, सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) तथा जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. प्राची नेहूलकर, माणुसकी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजाराम हुलवान, यांच्यासह विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, जिल्हा सामान्य रुग्णालयातील अधिकारी, कर्मचा-यांनी सहभाग घेतला होता.