महाड (प्रतिनिधी): महाड एमआयडीसी परिसरात असलेल्या एम्बायो या औषधनिर्मिती करणाऱ्या कंपनीत मंगळवारी सायंकाळी सुमारे सात वाजताच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. अचानक लागलेल्या या आगीमुळे संपूर्ण कंपनी परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. आगीमुळे प्रचंड ज्वाळा उसळत होत्या तर आकाशात काळ्या धुराचे लोट पसरले होते, त्यामुळे दूरवरूनही आगीचे दृश्य दिसत होते.
आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असून, परिसरातील इतर कंपन्यांमध्ये आग पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. खबरदारी म्हणून कंपनीतील कामगारांना तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.
ही कंपनी औषधी पदार्थांचे उत्पादन करत असल्याने आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी रासायनिक पदार्थांमुळे आग अधिक भडकली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सुदैवाने अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.
दरम्यान, पोलिस व आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी तैनात असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. आग पूर्णपणे आटोक्यात आल्यानंतरच नुकसानाचा अंदाज स्पष्ट होणार आहे.









