दत्ता ढवळेंच्या जनसंपर्काची ताकद प्रिया ढवळेंच्या पाठीशी
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या रणसंग्रामासाठी उद्या मतदान होत आहे. या निवडणुकीत चेंढरे पंचायत समिती मतदार संघातून प्रिया दत्ताराम ढवळे यांच्या उमेदवारीने मोठी चुरस निर्माण झाली असून, त्यांच्या प्रचाराला मिळणारा वाढता पाठिंबा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
प्रिया ढवळे यांच्या पाठीशी त्यांचे पती दत्ता ढवळे यांच्या कार्याची मोठी ताकद आहे. दत्ता ढवळे हे नाव चेंढरेकरांसाठी नवीन नाही. राजकीय क्षेत्रासोबतच सामाजिक क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान मोलाचे आहे. जनसामान्यांत रमणारा आणि हाकेला धावणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. विशेषतः चेंढरेतील स्मशानभूमीचा प्रश्न असो किंवा पाण्याचा प्रश्न, तो मार्गी लावण्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत गावकऱ्यांनी जवळून पाहिली आहे. उपसरपंच असताना त्यांनी रस्ते, वीज आणि घंटागाडी सारख्या मूलभूत सुविधांवर दिलेला भर त्यांच्या दूरदृष्टीची साक्ष देतो.
दत्ता ढवळे यांच्या कार्याचा वारसा पुढे नेत प्रिया ढवळे यांनी आपल्या धाडसी आणि स्पष्टवक्त्या स्वभावाने अल्पावधीतच जनसंपर्क दांडगा केला आहे. केवळ सत्ता मिळवणे हा माझा हेतू नाही, तर पंचायत समितीच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचे निर्णय घेणे हे माझे उद्दिष्ट आहे, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
अनेक अडचणींवर मात करत आणि प्रसंगी पदरमोड करून लोकसेवेला प्राधान्य देणारे दाम्पत्य म्हणून ढवळे कुटुंबाकडे पाहिले जाते. निवडणुकीच्या निमित्ताने घरोघरी प्रचारासाठी जात असताना महिला आणि तरुणांकडून त्यांना मिळणारा प्रतिसाद पाहता, त्यांची ‘कार्याची छाप’ आजही कायम असल्याचे दिसते. माणुसकी जपणारे आणि विकासाची ओढ असणारे नेतृत्व म्हणून प्रिया ढवळे यांना मतदारांचा कौल मिळण्याची शक्यता कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
उद्या होणाऱ्या मतदानानंतर चेंढरेच्या विकासाची सूत्रे कोणाच्या हाती जाणार, याचा फैसला होणार असला तरी, प्रिया ढवळे यांनी प्रचारात घेतलेली आघाडी विरोधकांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे.









