रायगड(जिमाका): दि.07 फेब्रुवारी 2026 रोजी रायगड जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुकीचे मतदान असल्याने वाहतूक कोंडी कमी करण्याच्या तसेच मतदान कर्तव्य पार पाडण्यासाठी जाणाऱ्या मतदारांचे हक्काचे दृष्टीने उपाययोजना म्हणून मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर जड अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे वाहतूक कोंडी होऊन मतदार मतदानापासून वंचित राहू नये याकरिता सदर मार्गावर वाहतूक नियंत्रित करण्याकामी जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दि.06 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 19.00 ते दि. दि.07 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 15.00 वा. वाजेपर्यत मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र.66 या मार्गावर जड-अवजड वाहनांकरिता (दुध, डिझेल, स्वयंपाकाचे गॅस, औषधे, ऑक्सीजन, भाजीपाला, पाणी इत्यादी जिवनावश्यक वस्तु वाहून नेणा-या वाहनांना वगळून) वाहतूक बंदी अधिसूचना जारी केली आहे.
रायगड जिल्हयात दि.07 फेब्रुवारी 2026 हा स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुक मतदानाचा दिवस आहे. रायगड जिल्हा हा पर्यटक जिल्हा असल्याने संपूर्ण रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक आपआपली वाहने घेवून येत असतात. पर्यटकांच्या वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. रायगड जिल्ह्यातील मतदार हा उपजिविकेसाठी मोठ्या प्रमाणावर बाहेरच्या जिल्ह्यात तात्पुरता स्थलांतरित आहे व त्यांचे मतदान हे रायगड जिल्ह्यातच असल्याने अशा वेळी असे मतदार हे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध वाहनांचा किंवा सामुदायिकरित्या मोठ्या प्रमाणावर बसेस बुक करून मतदानाकरीता येण्याची शक्यता आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 या रस्त्याचे कामकाज अद्यापपावेतो काही ठिकाणी सुरू असल्याने काही ठिकाणी हा रस्ता अरूंद असून या मार्गावरून प्रचंड प्रमाणात जड-अवजड वाहनांची वाहतूक होत आहे. तसेच त्यामुळे या मार्गावर नेहमीच दर शनिवार व रविवार या दिवशी पर्यटनासाठी येणारे पर्यटकांच्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून पर्यटकांना प्रवासाकरीता जास्तीचा वेळ लागतो. त्यातच मतदार हे मोठ्या प्रमाणावर मतदानासाठी बाहेर गावातून रायगडमध्ये येण्याची शक्यता आहे. सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024 व विधानसभा निवडणूक 2024 मध्ये मतदारांच्या वाहनांच्या संख्येत वाढ झाल्याने काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडीचा सामना करावा लागला होता.
ही वाहतूक बंदी अधिसूचना ही दुध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचे गॅस, औषधे, ऑक्सीजन, भाजीपाला, पाणी इत्यादी जिवनावश्यक वस्तू वाहून नेणारी वाहने, पोलीस वाहने, फायर ब्रिगेड वाहने रुग्णवाहीका यांना लागू राहणार नाही.
Home ताज्या बातम्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जड-अवजड वाहनांकरिता वाहतूक बंदी









