विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घेतला आढावा
मुंबई (धनश्री रेवडेकर) : श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम शताब्दी वर्षानिमित्त खारघरमध्ये आयोजित ‘हिंद-दी-चादर’ या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी नुकताच या तयारीचा सविस्तर आढावा घेतला असून, हा सोहळा शिस्तबद्ध आणि भव्य स्वरूपात पार पाडण्याचे निर्देश दिले आहेत.
खारघर येथील कॉर्पोरेट पार्क मैदानावर हा भव्य सोहळा रंगणार आहे. या कार्यक्रमासाठी केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर परदेशातूनही लाखो भाविक येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सुरक्षा, वाहतूक व्यवस्था आणि नागरी सुविधांचे सूक्ष्म नियोजन केले आहे. कार्यक्रमाच्या सुयोग्य व्यवस्थापनासाठी तब्बल २५ विशेष समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.
हा कार्यक्रम राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विभागाच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केला जात आहे. यात शीख समाजासह बंजारा, सिंधी, लबाना, वारकरी आणि इतर विविध समाजघटकांचा मोठा सहभाग असेल. या माध्यमातून श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचा त्याग आणि शौर्याचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रशासनाचा मानस आहे.
आढावा बैठकीत डॉ. सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले की, नागपूर आणि नांदेडप्रमाणेच येथील सोहळाही यशस्वी व्हावा यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. भाविकांसाठी शुद्ध पेयजल, आरोग्य सुविधा, फिरती शौचालये, निवास आणि भोजनाची चोख व्यवस्था करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. तसेच, कार्यक्रमादरम्यान शहरात वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी पोलीस विभागातर्फे स्वतंत्र वाहतूक आराखडा तयार करण्यात येत आहे.
या सोहळ्यामुळे सामाजिक ऐक्य आणि सद्भावनेची वीण अधिक घट्ट होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी व्यक्त केला आहे.









