अलिबाग (प्रतिनिधी): रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मतदानाला आज सकाळपासून सुरुवात झाली असतानाच, अलिबाग तालुक्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. अलिबागमधील सहान ३ अ या मतदान केंद्रावर मतदान यंत्रात तांत्रिक बिघाड झाल्याने तब्बल पाऊण तास मतदान प्रक्रिया ठप्प झाली होती. यामुळे सकाळच्या वेळी उत्साहाने आलेल्या मतदारांमध्ये मोठी नाराजी पाहायला मिळाली.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी ७:३० वाजता मतदानाला अधिकृत सुरुवात होणार होती. मात्र, सहान ३ अ केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे लक्षात आले. यंत्रणेतील या बिघाडामुळे मतदानाची वेळ होऊनही प्रक्रिया सुरू होऊ शकली नाही. परिणामी, मतदानासाठी सकाळी लवकर रांगेत उभे राहिलेल्या मतदारांना ताटकळत उभे राहावे लागले.
एकीकडे प्रशासनाकडून मतदानाची तयारी पूर्ण झाल्याचा दावा केला जात असताना, प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशीच यंत्रणेत बिघाड झाल्याने निवडणूक आयोगाच्या पूर्वतयारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. १२ हजाराहून अधिक कर्मचारी तैनात असल्याचा दावा केला जात असला, तरी ऐनवेळी झालेल्या या बिघाडामुळे प्रशासनाचा हलगर्जीपणा समोर आला आहे.
यंत्रणेत बिघाड झाल्याचे समजताच संबंधित तांत्रिक पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पाऊण तासाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर आणि दुरुस्तीनंतर आता या केंद्रावर मतदान प्रक्रिया पुन्हा सुरळीत सुरू झाली आहे. मात्र, या विलंबामुळे मतदारांच्या उत्साहावर विरजण पडल्याचे चित्र पाहायला मिळाले.
सध्या अलिबागमध्ये इतर ठिकाणी मतदान शांततेत सुरू असून, या तांत्रिक बिघाडाबाबत आता जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी काय स्पष्टीकरण देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.









