रायगड (प्रतिनिधी): रायगड जिल्हा परिषद तसेच जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी आज जिल्हाभरात शांततेत मतदान पार पडले. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या एकूण ५०२ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले असून आता सर्वांचे लक्ष सोमवारी होणाऱ्या मतमोजणीकडे लागले आहे. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत जिल्ह्यात अंदाजे साठ टक्क्यांहून अधिक मतदान झाल्याची नोंद झाली.
सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झाली. सुरुवातीच्या काही तासांत मतदारांचा प्रतिसाद कमी होता. पहिल्या दोन तासांत ११.५ टक्के मतदान झाले, तर साडेअकरा वाजेपर्यंत २७.५२ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दुपारी तीन वाजल्यानंतर मतदानाचा वेग वाढला. कामानिमित्त सकाळी मतदानास येऊ न शकलेले मतदार दुपारनंतर मतदान केंद्रांवर मोठ्या संख्येने दाखल झाले. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत जिल्ह्यात ५७.७७ टक्के मतदानाची नोंद झाली.
मतदानाच्या दिवशीच लग्नाचा मुहूर्त असल्याने जिल्ह्यात अनेक ठिकाणी लग्नसमारंभ सुरू होते. तरीही लोकशाहीप्रती जागरूकता दाखवत अनेक नवरदेव-नववधूंनी लग्नाआधी मतदान केले.
काही मतदान केंद्रांवर मतदान यंत्रांमध्ये तांत्रिक बिघाड झाला. अलिबाग तालुक्यातील सहाण आणि महाड तालुक्यातील सांदोशी येथे काही काळ मतदान प्रक्रिया थांबली होती. मात्र, तांत्रिक पथकाने वेळीच दुरुस्ती केल्याने मतदान सुरळीत झाले. पोलिसांच्या कडक बंदोबस्तामुळे जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.









