जिल्हाप्रमुख राजाभाई केणी यांच्या पत्नी रसिका केणी विजयी
अलिबाग(प्रतिनिधी): अलिबाग तालुक्यातील अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या आंबेपूर-कुर्डुस मतदारसंघातून शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख राजाभाई केणी यांच्या पत्नी रसिका केणी यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयामुळे अलिबागमध्ये शिवसेनेने आपले वर्चस्व सिद्ध केले असून भारतीय जनता पक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाला मोठा पराभव स्वीकारावा लागला आहे.
जिल्हाप्रमुख राजाभाई केणी यांच्या राजकीय अनुभवाचा आणि जनसंपर्काचा रसिका केणी यांना मोठा फायदा झाला. मतदारांनी त्यांच्या पारड्यात भरघोस मते टाकली.
अलिबाग तालुक्यात शेकापला एकापाठोपाठ एक धक्के बसत असून, आंबेपूर-कुर्डुस या महत्त्वाच्या गटातही त्यांना पराभवाचे तोंड पहावे लागले.
महायुतीतील मित्रपक्ष असूनही या ठिकाणी भाजपने दिलेले आव्हान रसिका केणी यांच्या झंझावातापुढे टिकू शकले नाही.
या विजयामुळे तालुक्यातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य पसरले असून, आगामी राजकारणात शिंदे गटाची ताकद अधिक वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.









