आवासच्या मतदारांचा विकासाला आणि ‘छोटमशेठ’ यांच्या अनुभवाला कौल.
अलिबाग (प्रतिनिधी): रायगड जिल्ह्यातील सर्वात प्रतिष्ठेच्या आणि हाय-व्होल्टेज ठरलेल्या आवास जिल्हा परिषद गटात शिवसेनेने (शिंदे गट) बाजी मारली आहे. शिवसेनेचे निष्ठावान आणि अनुभवी उमेदवार दिलीप भोईर ऊर्फ छोटमशेठ यांनी २३०० मतांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवत आवासवर शिवसेनेचा भगवा फडकवला आहे. या निवडणुकीत प्रबळ प्रतिस्पर्धी मानले जाणारे राजाभाऊ ठाकूर यांचा पराभव झाला असून, आवासच्या मतदारांनी विकासाला कौल दिला आहे.
आवास गटाची निवडणूक ही केवळ दोन उमेदवारांमधील लढत नव्हती, तर ती प्रतिष्ठेची लढाई बनली होती.
दिलीप भोईर (छोटमशेठ) यांनी यापूर्वी दोन वेळा निवडणूक लढवली होती. त्यांचा प्रदीर्घ अनुभव आणि जनसंपर्क यावेळी त्यांच्या विजयासाठी निर्णायक ठरला.
अलिबागच्या राजकारणातील मातब्बर व्यक्तिमत्व स्वर्गीय मधुशेठ ठाकूर यांचे सुपुत्र असल्याने त्यांच्याकडे राजकीय वारसा आणि मोठी सहानुभूती होती.
मात्र, मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच छोटमशेठ यांनी आपली आघाडी कायम ठेवली आणि अखेर २३०० मतांचे निर्णायक लीड घेत विजय निश्चित केला.
निकाल स्पष्ट होताच आवास परिसरात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. या विजयामुळे अलिबाग तालुक्यातील शिवसेनेच्या (शिंदे गट) ताकदीत मोठी भर पडली असून, आवास सारखा महत्त्वाचा गट ताब्यात आल्याने विरोधकांचे धाबे दणाणले आहेत.









