अलिबाग (प्रतिनिधी): शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांची राजकीय जादू आता संपुष्टात आली असून त्यांच्या वक्तव्याला जनतेकडून कोणतीही किंमत उरलेली नाही, अशी तीव्र टीका शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी केली आहे. जनतेने आता योग्य वेळी योग्य निर्णय घेत शेतकरी कामगार पक्षाला भूतकाळात ढकलले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आमदार दळवी म्हणाले की, “या भूतलावरून शेतकरी कामगार पक्ष संपलेला आहे. जयंत पाटील यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत अनेक वेळा कार्यकर्ते, मतदार आणि जनतेला फसवले. मात्र आज जनतेनेच त्यांना फसवण्याचा धडा शिकवला आहे.” जनतेने दिलेला हा कौल म्हणजे सत्य, माणुसकी आणि लोकशाहीचा विजय असल्याचेही त्यांनी नमूद केले.
ते पुढे म्हणाले की, “जनतेचा विश्वास हा कोणत्याही नेत्याची खरी ताकद असतो. तो विश्वास गमावल्यावर कोणतीही राजकीय जादू चालत नाही. शिवसेना ही नेहमीच सर्वसामान्य जनता, शेतकरी आणि युवकांच्या पाठीशी उभी राहिली आहे. त्यामुळे जनतेने शिवसेनेवर विश्वास दाखवत स्पष्ट कौल दिला आहे.”
या निर्णयातून जनतेने परिवर्तनाची इच्छा व्यक्त केली असून आगामी काळात विकास, पारदर्शकता आणि लोकहिताच्या राजकारणाला प्राधान्य दिले जाईल, असा विश्वास आमदार महेंद्र दळवी यांनी व्यक्त केला.









